मिरची लागवड

जाणून घ्या – मिरचीतील नफ्याचं गणित ! – मिरची लागवड

भाजीपाला पिकांमध्ये मिरची हे नगदी पीक आहे. बाजारात वर्षभर हिरव्या मिरचीला मागणी असते. आपल्या दररोजच्या आहारात मिरची हा अविभाज्य घटक आहे. मिरचीमध्ये विविध औषधी गुणधर्म देखील आढळतात. अ, ब, क आणि इ जीवनसत्व असलेली मिरची रक्तवर्धक आणि कृमीनाशक आहे. तिखटपणा व स्वाद यामुळे मिरची महत्वाचे मसाल्याचे पिक आहे. मिरचीचा औषधी उपयोग सुद्धा होतो. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे.


महाराष्ट्रात मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्टरी क्षेत्रावर हो`ते. महाराष्ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्रापैकी 68 % क्षेत्र नांदेड, जळगांव, धुळे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे. भारतात मिरचीची लागवड सर्वत्र होते.

मूळ स्थान उष्ण कटिबंधीय अमेरिका असून भारतात आणि त्याखेरीज दक्षिण आफ्रिका, दक्षिण आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया, अर्जेटिना, स्पेन, इजिप्त, चीन, जपान, व्हिएतनाम, ब्रह्मदेश, मलेशिया, इंडोनेशिया, पाकिस्तान या ठिकाणी मिरचीची लागवड होते. मिरचीच्या वर्गीकरणासंबंधी अनेक मतभेद आहेत. भारताचा मिरचीच्या उत्पादनात पहिला क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील नंदूरबार मिरचीच्या बाजारपेठेचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे. तरीही कित्येक शास्त्रज्ञ त्या प्रजातीच्या कॅप्सिकम अॅन्यूम आणि कॅप्सिकम फ्रुटेसेंस अशा दोनच जाती मानतात.

हवामान :

           उष्ण व दमट हवामानामध्ये मिरचीची वाढ जोमदार व भरपूर प्रमाणात होऊन उत्पादन चांगले मिळते.मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तीनही हंगामात करता येते.पण जास्त थंड हवामान मिरची पिकास मानवत नाही. मात्र थंडीची तीव्रता कमी असल्यास या काळात देखील मिरचीची लागवड करता येते. कारण थंड हवामानात मिरचीचा तिखटपणा कमी होऊन मिरची उशीरा पिकते. दव व मोठा पाऊस पडल्यास मिरचीच्या कळ्या, फुले, कोवळी फळे गळतात. परंतु योग्य काळजी घेतल्यास वरील नुकसानीचे प्रमाण टाळता येऊ शकते.

मिरचीला 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले मिरचीच्या झाडांची आणि फळांची वाढ 25 ते 30 सेल्सिअस तापमानाला चांगली होते. आणि उत्पादनही भरपूर येते.

जमीन :

भारी पण उत्तम निचऱ्याच्या जमिनीमध्ये मिरचीची उत्तम प्रकारे वाढ होते. तसेच तांबडी व मध्यम काळी, निचऱ्याची जमीनदेखील मिरची पिकास योग्य आहे. हलक्या जमिनीतही पुरेसे खत दिल्यास पीक चांगले येऊ शकते. साधारणतः मध्यम भारी ओल ठेवणाऱ्या जमिनीत हे कोरडवाहू पिक म्हणून घेता येते. आम्लयुक्त जमीन लागवडीस अयोग्य आहे. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये देखील मिरचीचे पीक बऱ्यापैकी येते.

जाती :

 सुधारित जाती –

 १) ज्वाला : भरपूर फांद्या असलेली, बुटकी, पाने गर्द हिरवी, फळे १० ते १२ सें. मी. लांब असतात. फळांवर आडव्या सुरकुत्या व कच्च्या फळांची साल हिरवट, पिवळी असते. फळ वजनदार व तिखट असून हिरव्या मिरचीसाठी चांगली जात आहे. ही जात बोकड्या रोगास चांगल्या प्रमाणात प्रतिकारक आहे.

२) ब्याडगी : या जातीची लागवड कर्नाटक राज्यातील धारवाड शिमोगा, चित्रदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होते. पिकलेली मिरची गर्द लाल रंगाची, पृष्ठभागावर सुरकुत्या असलेली १२ ते १५ सें. मी. लांब, कमी तिखट असते. जिरायत लागवडीसाठी योग्य जात आहे. कमी तिखट गर्द लाल म्हणून मिरचीला मध्यमवर्गात फार मागणी असून इतर मिरचीपेक्षा किलोला ५ ते १० रू. भाव जास्त असतो.

३) जी २,३,४,५ : या सुधारीत जातींची झाडे बुटकी असून फळांची लांबी ५ ते ८ सें. मी. असते. जी ४ : गुंटूरची (आंध्र) ही मिरची गेल्या २० वर्षापुर्वी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये मार्केटला आली. तेव्हा तेथील स्थानिक जातीपेक्षा आकर्षक असा रंग असल्याने मार्केटला चढ्या दराने विकली जावू लागली व स्थानिक जातीचे भाव घसरले. यामुळे जी ४ च्या मागणीचे प्रमाण या भागामध्ये वाढले. ज्या वेळेस हिरव्या मिरचीस भाव कमी असतो अशा वेळी वाळलेल्या मिरचीपासून तिखट तयार करून विकण्याचे लघु उद्योग उभारल्यास अधिक उत्पन्न मिळू शकते. हिरव्या मिरचीचे देखील उत्पादन मिळून एका वर्षामध्ये एकरी ५०,००० ते १,००,००० रुपये सहज मिळवता येतात. या शिवाय मिरचीच्या ज्योती, वैशाली ह्या जाती अधिक उत्पादन व भरपूर प्रमाणात तिखट असणाऱ्या आहेत. वैशाली ह्या जातीची फळे उलटी लागतात.

४) एन पी ४६ ए : झाडे बुटकी, झुडपासारखी व पसरणारी असून फळे १०.७ सें.मी. लांब व बिया कमी असतात. पहिली फुले ८४ दिवसांनी (रोपे लावणीनंतर) लागतात. बागायती मिरचीसाठी योग्य जात असून फुलकिड्यांना प्रतिकारक आहे. पिकलेले फळ आकर्षक तांबडे असून तिखटास चांगली आहे.

५) संकेश्वरी : झाडे उंच, भरपूर फांद्या असतात. फुले मोठ्या प्रमाणात असून फळांची लांबी १५ ते २० सें.मी. इतकी असल्याने जमिनीवर टेकतात. फळांची साल पातळ असून बी कमी असते. पिकलेल्या फळांचा रंग गडद तांबडा असून तिखट असल्याने मसाल्यासाठी योग्य जात आहे. जिरायत पिकासाठी योग्य जात आहे.

६) पंत सी १ : झाडे उंच वाढणारी असून रोप लावणीपासून ९० दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते. कोवळी फळे हिरवी व पिकलेली लाल रंगाची असतात. फळे ६ ते ७ सें.मी. लांब व भरपूर तिखट असतात. बोकड्या व मोझॅक रोगाचे प्रमाण कमी असते.

७) ज्योती : ज्योती या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शोधून काढलेल्या जातीबद्दल असेच सांगता येईल. उन्हाळ्यामध्ये ज्वालासारखी हिरवी मिरची कष्टकरी लोकांना ६ ते १० रू. पावशेर दराने घ्यावी लागते. ज्योती ही मिरची आखूड, पोपटी, हिरवी, गुच्छ लागलेली अधिक तिखट असल्याने अशी मिरची अधपाव (१२५ ग्रॅम) च पुरेशी होते. म्हणजे कष्टकरी लोकांचे ३ ते ५ रुपये वाचतात. ही मिरची चवीला तिखट आहे. बी जास्त प्रमाणात आहे. तसेच उत्पन्नासही चांगली जात आहे.

८) पुसा सदाबहार : बहुवर्षायु जात असून बोकड्या व मोझॅक रोगास प्रतिकारक आहे. या जातीचा खोडवा (२ ते ३ वर्ष) घेता येतो व दरवर्षी ६० ते ८० क्विंटल प्रति एकरी उत्पादन घेता येते. एका गुच्छामध्ये ६ ते १२ आकर्षक लाल मिरच्या असल्याने तोडणीचा खर्च वाचतो. मिरच्या अतितिखट असतात. औषधासाठी परदेशात भरपूर मागणी आहे.

९) काश्मिरी : याच प्रकारची काश्मिरी मिरची असून ही मिरची अतिशय गर्द लाल, आकार बारीक, बोराच्या आकारासारख्या असून कमी तिखट खाणाऱ्या भागात, बंगालमध्ये हिचा वापर करी मध्ये बुडवून काढून टाकण्यासाठी करतात. भज्यामध्ये वापरली जाणारी मिरची कमी तिखट, पोपटी रंगाची, जाड सालीची राजस्थानी किंवा दोंडाईचा मिरची असते. 

कलकत्त्यासारख्या शहरामध्ये लांब पिकाडोरसारखी परंतु पिकाडोर नसणारी वीतभर लांब, पोपटी, मऊ देठाची हिरवीगार असणारी व देठ जास्त दिवस टिकणाऱ्या मिरचीचा वापर होतो. या जाती प्रचलित असून वैशाली जात आखूड, लवंगी, झाडावर उलट्या लागणाऱ्या अति तिखट व दिसायला आकर्षक असून ज्योतीपेक्षाही अधिक तिखट जाणवतात. कष्टकरी लोकांमध्ये ही मिरची प्रचलित आहे.

स्थानिक जाती :

१) दोंडाईचा : या जातीची झाडे उभी व जोमदार वाढतात. विस्तार इतर जातींपेक्षा मोठा असून फळे लांब व रुंद वजनदार असतात. फळांची साल जाड असून फळ देठाकडे रुंद व टोकाकडे किंचीत निमुळते असते. फळांची लांबी ८ ते १० सें.मी. व रुंदी १ सें.मी. असते. या जातीस भावनगरी देखील म्हणतात. तिखट कमी प्रमाणात असल्याने भजी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने या जातीस भरपूर मागणी आहे.

२) देगलूर : या जातीची फळे लांब व देठापासून एकाच जाडीची असून मध्यम तिखट असतात. मराठवाड्यामध्ये या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात होते.

३) पांढुरणी : या जातीची फळे मध्यम लांबीची असून फळे रुंद व मध्यम तिखट असतात. बागायती उत्पादन चांगले मिळत असून विदर्भामध्ये लोकप्रिय जात आहे.

संकरित जाती :

१) एम. एच. पी. १,५ (सुजाता), २,९,१० (सुर्या) महिकोच्या संकरित जाती असून झाडे सरळ वाढणारी व भरपूर फांद्या, पाने गर्द हिरवी असतात. फळांची लांबी ६ ते ९ सें.मी. पर्यंत असते. अधिक उत्पादन व पिकलेली फळे लाल रंगाची व चमकदार सालीची असतात.

२) अग्नि : सँडोज कंपनीची जात असून भरपूर तिखट असते. फळे ७ ते ११ सें.मी. लांब असतात. वजन ६ ते ९ ग्रॅम असते. अधिक उत्पादन देणारी हिरव्या व लाल मिरचीसाठी योग्य जात आहे.

 ३) टोमॅटो मिरची : फळांचा आकार मोठा, लाल असल्याने भरपूर मागणी आहे. कमी तिखट असून भजी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. फळांमध्ये बिया कमी असतात. एकरी ८० क्विंटल उत्पादन मिळते.

खते :

           लागवडीपुर्वी एकरी शेणखत १ ते २ टन आणि कल्पतरू सेंद्रिय खत ५० ते ७५ किलो द्यावे. नंतर १ महिन्याने पहिली खुरपणी झाल्यानंतर एकरी ५० ते ६० किलो कल्पतरू खत द्यावे. नंतर फुलकळी लागतेवेळी एकरी ५० ते ७५ किलो कल्पतरू खत जमिनीच्या मगदुरानुसार द्यावे. खत हे वाफश्यावर झाडाच्या खोडाभोवती गाडून द्यावे. खत दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे.

बियाणे :

सुधारीत जातीचे एकरी ३०० ते ४०० ग्रॅम तर संकरीत जातीचे ८० ते १०० ग्रॅम बी पुरेसे होते.

रोपे तयार करणे :

बियांपासून रोपे तयार करण्यापुर्वी मिरचीच्या बियांना जर्मिनेटर या औषधाची प्रक्रिया करावी. यासाठी (२० ते २५ मिली जर्मिनेटर + १० ग्रॅम प्रोटेक्टंट + १०० ते ५०० ग्रॅम बी + २५० मिली ते १ लि. पाणी (बियाण्याच्या प्रमाणानुसार) या प्रमाणात बी ४ ते ५ तास भिजवून सावलीत सुकवावे थंडीच्या दिवसात बीजप्रक्रियासाठी कोमट पाणी वापरावे. रोपांसाठी तयार केलेल्या गादीवाफ्यासाठी भरपूर शेणखत किंवा कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केल्यास रोपांची वाढ चांगली होते. वाफ्यांच्या रुंदीस समांतर दर १० सें.मी. अंतरावर ओळी काढताना त्या फार खोल घेऊ नयेत. कारण उगवण कमी होण्याची शक्यता असते. प्रक्रिया केलेले बी पातळ पेरावे व मातीने झाकून घ्यावे. दर ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे. प्रक्रिया केलेले बी ४ ते ५ दिवसात उगवते व लवकर लागणीस येते.

लागवड :

लागवडीसाठी तयार केलेली रोपे लावणीपुर्वी जर्मिनेटर व प्रोटेक्टंटच्या द्रावणामध्ये (१०० मिली जर्मिनेटर + ५० ग्रॅम प्रोटेक्टंट + १० लि. पाणी) पुर्णपणे बुडवून घ्यावीत. त्यामुळे नांगी न पडता वाढ जोमदार होऊन मर होत नाही. अशी रोपे सऱ्यांच्या बगलेमध्ये प्रत्येक ठिकाणी १-१ रोप लागावे. लागवड ६० x ४५ सें.मी. किंवा ७५ x ६० सें.मी. अंतरावर करतात.

पाणी :

दुपारी उन्हाच्यावेळी झाडे कोमेजल्यासारखी दिसू लागली की पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी देणे टाळावे. झाडे फुलांवर असताना पाण्याचा ताण पडल्यास फुले व फळे गळण्याचे प्रमाण वाढते, म्हणून अशा अवस्थेमध्ये पाणी नियमित द्यावे.

कीड व रोग :

किडी : फुल किडे, कोळी, मावा, खोड कुरतडणारी अळी इ. किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.

१) फुलकिडे (थ्रिप्स ) : फुलकिडे हे कीटक आकाराने अतिशय लहान असून त्यांची लांबी एक मिलीमीटरपेक्षाही कमी असते. त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. हे कीटक पाने खरवडून त्यातून बाहेर येणाऱ्या रसाचे शोषण करतात. त्यामुळे पानांच्या कडा वरच्या बाजूला चुरडलेल्या दिसतात. हे कीटक खोडातील रसही शोषतात, त्यामुळे खोड कमजोर बनते, पाने गळतात आणि झाड सुकते. याशिवाय फुलकिड्यांमुळे बोकड्या (चुरडामुरडा) या विषाणुजन्य रोगाचा प्रसार होतो. या किडीच्या उपद्रवामुळे मिरचीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

२) कोळी (माईट्स ) : ही कीड अतिशय लहान असून किडीचा रंग पिवळसर करडा असतो. कोळी पानांतील रसाचे शोषण करतात. त्यामुळे पानांवर चुरडा दिसू लागतो. चुरडलेल्या पानाच्या कडा खालच्या बाजूस मुडपल्या जातात. फुलांच्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास फुले गळतात. फळे वेडीवाकडी होतात आणि फळांचा आकार लहान राहतो.

३) मावा (अॅफिड्स ) : मावा हे कीटक मिरचीच्या कोवळ्या पानांतील आणि शेंड्यातील रस शोषण करतात, त्यामुळे नवीन पाने येणे बंद होते.

रोग : करपा, मिरच्या कुजणे, बोकड्या, मोझॅक विषाणू रोग, मर, मुळकुजव्या इ. रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.

१) मिरच्या कुजणे : हा रोग बुरशीमुळे पक्व फळांना होतो. प्रथम लाल मिरचीवर लहान काळसर ठिपका दिसतो. तो हळूहळू मिरचीच्या लांबीच्या बाजूस पसरत जातो. नंतर फळावर मोठे काळे डाग दिसतात. पुढे बुरशीची वाढ बियांवर देखील होते. ओलसरपणा व दवसारखे पडत असल्यास रोगाचे प्रमाण वाढते.

 २) बोकड्या : पाने अतिशय बोकडणे म्हणजे विकृती अशावेळी पानांचा आकार बिघडतो. यालाच पर्णगुच्छ (Rosette Appearance) म्हणतात. परंतु काहीजण अशी अवस्था दिसताच व्हायरस झाला म्हणतात. हे चुकीचे आहे. ही विकृती पिकास अन्नद्रव्य कमी पडल्यामुळे किंवा माव्यासारख्या किडीने पानातील अन्नरस शोषून घेतल्याने ही विकृती तयार होते.

३) मुळकुजव्या / करकोचा : ह्या रोगाची लागण पिकांना सुरुवातीच्या काळात होते. भारतभर सर्वत्र ऊन पडतेच, पाऊस पडतो किंवा वरून जादा पाणी दिल्यास करकोचा येतो. हल्ली वरकस जमीन मुरूम असल्यामुळे तापते व पाऊस पडल्यावर किंवा पाणी दिल्यावर पिकाच्या केषाकर्षक मुळ्यांवर आघात होऊन मुळकुजव्या/करकोचा (Collar Rot Disease ) रोग पिकांस होतो.

४) मिरची न लागणे : यालाच बरेच जण मिरची फिरली असे म्हणतात. मिरचीला फुलकळी लागत नाही तसेच फुलगळ होते. अशावेळी सप्तामृताचा वापर केल्यास प्रभावी उपाय होतो. सुरूवातीपासून सप्तामृताच्या फवारण्या केल्या असता प्रतिबंधात्मक उपायही करता येते.

हिरव्या मिरचीची तोडणी :

अडीच महिन्यानंतर तोडणी सुरू होते. पुर्ण वाढलेल्या व सालींवर विशिष्ट चमक असलेल्या फळांची देठासहित ४ ते ६ दिवसांचे अंतराने तोडणी करावी. तोडणीनंतर मिरच्या ताबडतोब पोत्यामध्ये भरून बाजारात पाठवाव्यात. तीन महिन्यापर्यंत तोडणी चालू राहून या कालावधीत मिरचीचे १५ ते २० तोडे होतात.

तांबड्या मिरचीची तोडणी :

सुरुवातीचे एक ते दोन तोडे हिरव्या मिरचीचे करावेत. त्यामुळे पुढे मिरच्या अधिक लागतात. त्यांनतर लागलेल्या मिरच्या अर्धवट पिकल्यावर तोडाव्यात. त्या मिरचीचे २ ते ३ दिवस ढीग करून ठेवल्यास अर्धवट पिकलेल्या मिरच्या चांगल्या पिकतात व सर्व मिरच्यांना आकर्षक तांबडा रंग येतो.

उत्पादन :
      
     हिरव्या मिरचीचे सर्वसाधारण उत्पादन ४० ते ४५ क्विंटल मिळते. तर वाळलेल्या मिरचीचे ४०० ते ४५० किलो उत्पादन मिळते. महिकोच्या तेजस्विनी, सुजातासारख्या जातीच्या हिरव्या मिरच्याचे उत्पादन एकरी ३.५ ते ५ टनापर्यंत मिळते.

Comments