आधुनिक पद्धतीने शेती करणारे करोडपती शेतकरी

आधुनिक पद्धतीने शेती करणारे करोडपती शेतकरी

पूर्वी 'उत्तम खेती, मध्यम व्यापार, निकृष्ट चाकरी, भीख निदान' ही हिंदीतील म्हण खूप प्रचलित होती. हिचा अर्थ शेती करणे हे सर्वोत्तम कार्य आहे, व्यापार हे मध्यम कार्य आहे, नोकरी हे निकृष्ट दर्जाचे काम आहे, तर भीख मागणे हे सर्वात वाईट काम आहे. वर्षानुवर्ष चालत आलेली धारणा मात्र आता पूर्णपणे बदलली आहे. व्यापार आजही मध्यम दर्जाचे कार्य आहे, मात्र नोकरीला सर्वोत्तम दर्जा प्राप्त झाला असून, शेती करण्याला निकृष्ट दर्जा दिला जात आहे. कोणत्याही व्यापाराचा किंवा शेतकऱ्याचा मुलगा असला तरी त्या सर्वांचे स्वप्न हे आता नोकरी करणे हेच आहे.

परंतु, असे काही शेतकरी ज्यांनी या बदलत्या धारणेला चुकीचे ठरवत प्राचीन म्हणच योग्य असल्याचे सिद्ध केले आहे. हे शेतकरी आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती व्यवसायातून मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहेत. आज अशाच काही शेतकऱ्यांच्या यशाची कहाणी तुम्हाला सांगणार आहोत...

गुजरातमधील अमीरगढ परिसरातील रामपूर-बडला गावात राहणारे शेतकरी इस्माईल रहीम शेरू यांनी आपली एक आधुनिक प्रगतीशील शेतकरी अशी ओळख निर्माण केली आहे. बी.कॉम पर्यंतचे शिक्षण घेतलेले इस्माईल भाई आज एक करोडपती शेतकरी आहे. त्यांच्या कुटुंबियांना वाटत होते की, त्यांनी चांगली नोकरी करावी. परंतु, शेती करत आपली एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली.

१९९८ मध्ये ते कॅनडातील मैक्केन कंपनीच्या संपर्कात आले. त्यावेळी त्यांनी कंत्राटी पद्धतीने या कंपनीसाठी बटाटा उत्पादन घेणे सुरु केले. ५ एकराच्या वडिलोपार्जित जमिनीवर सुरु झालेला त्यांचा हा व्यवसाय सध्या ४०० एकरपर्यंत पोहचला आहे. इस्माईल भाई मैक्केन कंपनीसोबतच आता मैक्डोनल्ड या नामांकित कंपनीलाही बटाटा पुरवठा करतात. त्याच्या या व्यवसायातून सध्या त्यांचा काही कोटींचा टर्नओहर आहे.

वल्लरी चंद्रकर छत्तीसगडची राजधानी रायपुरपासून ८८ किमीवर असलेल्या पठारीमुडा गावातील महिला शेतकरी आहे. २७ वर्षीय वल्लरीने कंम्पुटर सायन्समध्ये एम.टेक केले आहे. तिने आपले शिक्षण २०१२ मध्ये पूर्ण केले. त्यानंतर तिने एका कॉलेजमध्ये ३ वर्ष असिस्टंट प्रोफेसर मधून नोकरी सुरु केली. मात्र नोकरीत वल्लरीचे मन रमेना. तिने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचा निर्णय घेतला आणि ती नोकरी सोडून घरी आली.

त्यांनतर २०१६ मध्ये वल्लरीने १५ एकर जमिनीपासून शेती करणे सरू केले. तिच्या वडिलांनी काही जमीन ही फार्म हाउस बनवण्यासाठी खरेदी केली होती. तिला ती जमीन शेती करण्यासाठी योग्य वाटली. त्या जमिनीत तिने भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केली. शेतीच्या नवतंत्रज्ञानाची माहिती तिने इंटरनेटच्या माध्यमातून मिळवली. यामध्ये तिने इस्राईल, दुबई, थायलंड यांसारख्या देशांमध्ये कशा पद्धतीने शेती केली जाते. याची माहिती मिळवली. तिने पिकलेल्या भाजीपाल्याची गुणवत्ता चांगली असल्यामुळे तिने आपला भाजीपाल्याची आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करण्याची योजना बनवली आहे.

मुळचा आंध्रप्रदेशातील एका छोट्याशा गम्पलागुडम गावात जन्मलेला नागा कटारु नामांकित कंपनी गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होता. २००० साली नागा यांची गुगल या कंपनीत नियुक्ती झाली. तेव्हा ती एक नवीन कंपनी होती. २००३ मध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत असताना नागा यांनी गुगल अलर्टचा शोध लावला आहे.

गुगलमध्ये जवळपास ८ वर्षांची नोकरी केल्यानंतर नागा यांचे मन नोकरी करण्यापासून दूर होऊ लागले. काही तरी नवीन करण्याचा विचार त्यांच्या मनाला स्पर्श करत होता. त्यातच त्यांनी कॅलिफोर्नियात ३२० एकर जमीन खरेदी करत बदामची शेती करण्याचा निर्णय घेतला. बदाम शेतीसाठी कॅलिफोर्नियाचे हवामान हे उत्कृष्ट मानले जाते. सध्या बदामच्या शेतीपासून त्यांची वार्षिक कमाई ही २.५ मिलियन डॉलर अर्थात १७ कोटी इतकी आहे.

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेले ओंकार चौधरी हे प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. जळगाव हे जिल्हा केळीसाठी देशात आणि जागतिक पातळीवर लोकप्रिय आहे. ओंकार यांनी आपला शिक्षकी पेशा सांभाळळून केळीची शेती करणे सुरु केले. त्यातून ते आज रिटायरमेटच्या काळात ४० एकरवर केळीची शेती करत आहे.

त्यांचा अमेरिकेतील एक कंपनी सोबत करार झाला असून, दरवर्षी निर्धारित टन केळी ते निर्यात करतात. वडिलोपार्जित त्यांच्याकडे फक्त ४ एकर जमीन होती. परंतु सध्या चौधरी हे ४० एकरवर केळीची शेती करत असून, त्यातून ते १२ हजार ५०० क्विंटल केळीचे उत्पादन घेतात. ज्यातून त्यांची कमाई ही वार्षिक दीड कोटी इतकी आहे.
Dailyhunt

Comments